बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बागेत बसलेल्या तरुण-तरुणीचे लावले जबरदस्तीने लग्न

कडवी हिंदुत्ववादी संघटना असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांक़डून बागेत बसलेल्या एका तरुण आणि तरुणीचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी हैदराबाद येथे व्हॅलेंटाईन दिनाला विरोध करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे.
व्हॅलेंटाईन दिनी हे जोडप एका बागेत बसलेले असताना बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यांच्याजवळ पोहोचले आणि त्यांनी संबंधीत तरुणाच्या हातात गळ्यात घालण्याचा टाय दिला आणि तो तरुणीच्या गळ्यात मंगळसुत्राप्रमाणे घालण्यास सांगितले. हैदराबादमधील मेडचळ येथील कंदलकोया ऑक्सिजन पार्कमध्ये ही घटना घडली आहे.
या घटनेचा व्हिडिओही या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काढला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक जण म्हणतोय की, आजचा दिवस खूपच खास दिवस आहे. कारण एक तरुण आज लग्नगाठ बांधत आहे. तर दुसरा एक जण या जोडप्याचे अभिनंदन करताना दिसत आहे.
बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि इतर उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या गटांनी तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशात विविध ठिकाणी व्हॅलेंटाईन दिनाला विरोध करीत निदर्शने केली. या लोकांनी हातात भगवे झेंडे घेऊन जय श्रीरामच्या घोषणा देत संत व्हॅलेंटाईनचा पुतळाही जाळला. याप्रकरणी पोलिसांनी एल. बी. नगर येथे निदर्शने करणाऱ्या एका गटाला अटक केली आहे.





