breaking-newsआंतरराष्टीय

फाइव्ह जी, व्यापार, इराण मुद्दय़ांवर मोदी-ट्रम्प यांच्यात फलदायी चर्चा

ओसाका : जी २० देशांच्या शिखर बैठकीच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात खुली व फलदायी स्वरूपाची चर्चा झाली. त्यात, फाइव्ह जी, व्यापार, इराण अशा अनेक विषयांचा समावेश होता. व्यापारातील अडथळ्यांच्या मुद्दय़ांवर दोन्ही देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक लवकरच घेण्यास त्यांनी मान्यता दिली. दहशतवादासारख्या जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जगाला खंबीर नेतृत्व देण्याचा निर्धार मोदी व ट्रम्प यांनी बोलून दाखवला, तसेच द्विपक्षीय व्यापाराच्या मुद्दय़ावर उभय नेत्यात चर्चा झाली. मोदी हे सध्या ओसाकात असून त्यांनी, अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांच्या माध्यमातून पाठवलेल्या संदेशात निवडणुकीतील यशाबाबत अभिनंदन करून भारताविषयी प्रेम व्यक्त केल्याबाबत अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले.

मोदी यांनी सांगितले, की दोन्ही देशात आर्थिक व सांस्कृतिक संबंध वाढवण्यास आपण वचनबद्ध आहोत. इराण, फाइव्ह जी मोबाईल सेवा, द्विपक्षीय संबंध, संरक्षण संबंध यावर चर्चा झाली. तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर करणे, संरक्षण व सुरक्षेत सहकार्य, व्यापारात सुलभता या मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली, असे मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले, की दोन्ही नेत्यातील बैठक खुली व फलदायी ठरली असून ट्रम्प यांनी मोदी यांचे निवडणुकीतील यशाबाबत अभिनंदन केले. माइक पॉम्पिओ यांच्या माध्यमातूनही त्यांनी अभिनंदन संदेश पाठवला होता, त्याचा मोदी यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. भारत व अमेरिका यांच्यातील संबंध पुढच्या पातळीवर नेण्यासाठी दोन्ही देशांच्या नेत्यांनी चर्चा केली. त्यात, अर्थ, व्यापार, ऊर्जा, संरक्षण, दहशतवाद प्रतिबंध, अवकाश या मुद्दय़ांचा समावेश होता, असे व्हाइट हाऊसच्या निवेदनात म्हटले आहे.

तेलाच्या किमती स्थिर राहण्याची आशा

इराणकडून भारत ११ टक्के तेल घेत असतो ,पण आता ही आयात कमी करण्यात आली आहे असे परराष्ट्र सचिव गोखले यांनी स्पष्ट केले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाची काही जहाजे तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती मोदी यांनी दिली. तेलाच्या किमती वाढणार नाहीत अशी आशा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणच्या मुद्दय़ावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे ठरवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button