पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालणारा आरोपी अटकेत
उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमधील स्याना हिंसाचारप्रकरणी पोलीस निरिक्षकाला गोळी मारुन ठार करणाऱा आरोपी प्रशांत नट याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी रात्री उशीरा या पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातलेल्या कलुआ नामक व्यक्तीलाही अटक केली आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीस कलुआकडे चौकशी करीत होते.
३ डिसेंबर रोजी स्याना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंगरावठी भागात झालेल्या हिंसाचारात पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्यासह स्थानिक तरुण सुमीत याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुबोधकुमारला गोळी मारणाऱ्या प्रशांत नटसह २९ जणांना आजवर अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या प्रशांत नटने पोलीस निरिक्षकाला आपणच गोळी घातल्याची कबूली दिली होती. मात्र, पोलिसांच्या चौकशीत हे स्पष्ट झाले की, सुबोधकुमार यांना गोळी घालण्यापूर्वी त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले होते. हा हल्ला करणाऱ्या कलुआला पोलिसांनी सोमवारी रात्री साडे दहा वाजता ताब्यात घेतले, याची माहिती एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी दिली.