पोलीश मुलीचे पंतप्रधानांना भावनीक पत्र; आईसह भारतात परतण्याची मागितली परवानगी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/marta-kotlarska-and-her-daughter1.jpg)
गोव्यातील आपले वास्तव्य विसरता येत नसल्याने अर्थात गोव्याच्या प्रेमात पडलेल्या मात्र, व्हिसा संपलेला असतानाही अनधिकृतरित्या भारतात राहिल्याने ब्लॅकलिस्टेड झालेल्या एका पोलीश महिलेने आणि तिच्या ११ वर्षीय मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुन्हा भारतात परतण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी या दोघींनी पंतप्रधान मोदी, गृहमत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना पुन्हा भारतात परतण्याची परवानगी मिळावी यासाठी विनंती केली आहे.
मार्टा कोटलारस्का असे या पोलीश (पोलंड) महिलेचे नाव असून ती एक कलाकार आणि फोटोग्राफर आहे. अलेक्झा असे तिच्या ११ वर्षीय मुलीचे नाव आहे. सध्या या दोघी कंबोडियामध्ये राहत आहेत. २४ मार्चला श्रीलंकेतून बंगळूरूच्या केम्पेगोवडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतल्यानंतर मार्टाला ताब्यात घेण्यात आले होते. तिची व्हिसाची मुदत संपल्याने तिला अटक करण्यात येऊन ब्लॅकलिस्टही करण्यात आले होते.
दरम्यान, मार्टाने ट्विटकरुन मोदी आणि शाह यांना विनंती केली की, माझी ११ वर्षीय मुलगी अलेक्झा हिला तिच्या गोव्यातील शाळेची खूपच आठवण येत असून ती पुन्हा त्या शाळेत जाण्यासाठी वारंवार रडत आहे. तिच्या शाळेचे नवे वर्षही आता सुरु झाले आहे. २५ एप्रिलपासून माझ्या मुलीची शाळा सुटली आहे.
यासंदर्भात मी संबंधीत यंत्रणेकडे माझे गाऱ्हाणेही मांडले होते, मात्र त्याला कुठलीही प्रतिक्रिया मिळालेली नाही की त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. कृपया आमची मदत करा. माझ्या ११ वर्षीय मुलगी खूपच कष्टी आहे, असे मार्टाने ताज्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच तिने म्हटले की, आम्ही गुन्हेगार नाही आहोत. आम्हाला कधीही भारतातून हाकलून देण्यात आलेले नाही. आम्हाला पोलंडमधील भारतीय दुतावासाकडून कोणत्याही अडचणीशिवाय नवा व्हिसाही देण्यात आला होता. भारतातील माझ्या कामातील अडचणीमुळे माझ्यावर व्हिसा संपल्यानंतरही गोव्यात राहण्याची वेळ आली होती, असे पंतप्रधान, गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांना टॅग केलेल्या ट्विटमध्ये तिने म्हटले आहे.
मार्टाची अकरा वर्षीय मुलगी अलेत्झाने पंतप्रधानांना स्वतःच्या हाताने एक पत्र लिहिले हे पत्रही मार्टाने पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. यात अलेत्झाने म्हटले आहे की, काही काळापूर्वी गोवा आपलं घरं होत, आम्हला पुन्हा एकदा भारतात परतायचं आहे. गोव्यात घालवलेल्या दिवसांची तसेच भारतात मिळालेल्या आनंददायी क्षणांची मला खूप आठवत आहेत. गोव्यातील माझी शाळा मला खूपच आवडत होती. तिथलं नैसर्गिक वातावरण माझ्या खूपच आवडीचं होतं. तिथे मी प्राण्यांच्या रेस्क्यू सेंटरमध्ये गायींची देखभाल करीत होते.