पाक लष्कराच्या मुख्यालयात इम्रान खान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/imran-khan-.jpg)
- सुरक्षेचा घेतला आढावा : जनरल बाजव यांच्यांशी 8 तास चर्चा
रावळपिंडी – पाकिस्तानचे नूतन पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरूवारी पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाचा दौरा करून सुरक्षेचा आढावा घेतला. पाकिस्तान सध्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांना तोंड देत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. विशेष म्हणजे लष्कराच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांबरोबर त्यांची ही बैठक तब्बल 8 तास केली.
यादरम्यान पाकचे लष्करप्रमुख जनरल जावेद बाजवा यांनीही लष्कर नागरी प्रकरणांमध्ये लक्ष घालणार नसल्याची ग्वाही दिली. यापूर्वी लष्करप्रमुख जावेद बाजवा यांनी इम्रान खान यांना “गार्ड ऑफ ऑनर’ दिले. इम्रान खान यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. पाक लष्कराच्या माध्यम विभागाने ट्विट करून याची माहिती दिली.
पंतप्रधानांना सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा आणि इतर महत्वपूर्ण प्रकरणांची माहिती देण्यात आली. पंतप्रधानांबरोबर संरक्षण, परराष्ट्र, अर्थ आणि माहिती विभागचे मंत्रिही उपस्थित होते, असे या ट्विटमध्ये म्हटले.माहिती मंत्री फवाद चौधरी यांनीही ट्विट करून याची माहिती दिली.
पाक लष्कर मुख्यालयाचा दौरा शानदार होता. आमच्या सर्वोत्तम लष्कर प्रमुखांना भेटल्याचा पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्र्यांना अभिमान आहे. सर्व संस्थांमध्ये योग्य समन्वय आणि सहकार्याने पाकिस्तानसमोर असलेल्या सर्व समस्यांचा सामना करता येईल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.