पश्चिम बंगालमधील पोटनिवडणूकीमध्ये माकपला कॉंग्रेसचा पाठिंबा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/cpm-and-congress-.jpeg)
कोलकाता – पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी कॉंग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ केला आहे. या महिन्याच्या 28 तारखेला विधानसभेच्या महाशितला मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामध्ये कॉंग्रेसने माकपला पाठिंबा दिल्यामुळे आगामी काळात या दोन्ही पक्षांमधील जवळीक वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने 2016 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये आघाडी केली होती. मात्र ही आघाडी 2015 सालच्या धोरणाला अनुसरून नसल्याचे कारण देऊन माकपच्या मध्यवर्ती कमिटीने आघाडी मोडली होती. मात्र आता कॉंग्रेसकडून पुन्हा एकदा मार्क्सवाद्यांबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे. महाशितला विधानसभेच्या पोटनिवडणूकीत कॉंग्रेस पक्ष उमेदवार उभा करणार नाही, असे कॉंग्रेस नेते आणि विरोधीपक्ष नेते अब्दुल मन्नान यांनी सांगितले आहे.
जेंव्हा 2016 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाली होती. तेंव्हाही कॉंग्रेसने महाशितलाच्या जागेवर उमेदवार उभा केला नव्हता. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस या दोन्ही पक्षांविरोधात मार्क्सवाद्यांबरोबरची आघाडी कायम रहावी, यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे मन्नान यांनी सांगितले.