पंतप्रधान मोदींना आठव्यांदा क्लीनचीट; ECच्या मते मतदानादिवशी ‘रोड शो’ गैर नाही
![PM convenes emergency high-level meeting; Likely to be an important decision](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/modi02.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाकडून पुन्हा एकदा अचारसंहिता भंगाच्या दोन तक्रारींतून मुक्तता करण्यात आली आहे. २३ एप्रिल रोजी अहमदाबाद येथे केलेला कथीत ‘रोड शो’ आणि ९ एप्रिल रोजी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे केलेल्या भाषणाबाबत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे आता एकूण आठ वेळा मोदींना निवडणूक आयोगाकडून क्लीनचीट देण्यात आली आहे.
अहमदाबादमध्ये मतदानादिवशी ‘रोड शो’ करुन मोदींनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केलेले नाही, असे निरिक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे ९ एप्रिल रोजी मोदींनी आपल्या भाषणात नवमतदारांना आवाहन केले होते की, बालाकोट येथे हवाई हल्ला करणाऱ्या आपल्या शूर जवानांसाठी तुम्ही मतदान करा. हे मोदींचे विधानही गैर नसल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. पीटीआयच्या हवाल्याने इंडिया डॉटकामने याबाबत वृत्त दिले आहे.
२३ एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर मोदी मतदान केंद्राबाहेर काही वेळ चालत जाऊन माध्यमांशी बोलले होते. मोदींच्या या कृत्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. अशा प्रकारे मतदानानंतर ‘रोड शो’ करणे आणि माध्यमांसमोर राजकीय भाष्य करणे हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.
यापूर्वी निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनाही त्यांच्या नागपूरातील भाषणाबाबत क्लीनचीट दिली आहे. या सभेत शाह राहुल गांधी निवडणूक लढवत असलेल्या वायनाड मतदारसंघाबाबत म्हणाले होते की, देशातील बहुसंख्यांक हे वायनाडमध्ये अल्पसंख्यांक आहेत. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.