पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते आज अत्याधुनिक चाचणी केंद्राचे उदघाटन
![# Covid-19: Produce vaccines at full capacity: Prime Minister Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Narendra-Modi-1-1.jpg)
नवी दिल्ली – भारतातील जीवघेण्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई , नोएडा आणि कोलकाता येथील आयसीएमआरच्या अत्याधुनिक चाचणी केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे उद्घाटन होणार आहे.
आयसीएमआरच्या अत्याधुनिक चाचणी केंद्राचा लाभ महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह शेजारच्या राज्यांनाही होणार आहे. मुंबईतील प्रयोगशाळेचा उपयोग महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांना होणार असून नोएडातील प्रयोगशाळेचा उपयोग उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांसाठी होणार आहे. तसेच कोलकातामधील प्रयोगशाळेचा उपयोग पश्चिम बंगाल आणि शेजारच्या राज्यांना होणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सुविधांमुळे देशातील कोरोना चाचण्यांची क्षमता वाढेल आणि रोगाचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार करण्यास मदत होईल. अशा प्रकारच्या या सुविधेमुळे कोरोना साथीचा प्रसार नियंत्रित करण्यास मदत मिळेल. नोएडा, कोलकाता आणि मुंबईत दररोज १० हजारांहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात सक्षम असणारे हे अत्याधुनिक चाचणी केंद्र तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे.