नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या पळून जाण्यामध्ये आमचा हात नाही – सीबीआय
पंजाब नॅशनल बँकेच्या दोन अब्ज रुपयांहून जास्तीच्या घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या फरार होण्यामागे आमच्या अधिकाऱ्यांचा कोणत्याही प्रकारे हात नाही असं स्पष्टीकरण सीबीआयने शनिवारी दिलं. त्या दोघांबाबत बँकेकडून आमच्याकडे तक्रार आली तेव्हा भारतातून पळून त्यांना महिना उलटला होता. तक्रार आल्यानंतर सीबीआयने तातडीने पावलं उचलायला सुरूवात केली होती. त्यामुळे नीरव मोदी आणि चोक्सीच्या फरार होण्यामागे आमच्या कोणत्या अधिकाऱ्याचा हात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्टीकरण सीबीआयने दिलं आहे.
सीबीआयमधील गुजरात केडरचे अधिकारी ए. के. शर्मा यांनी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या पलायनात महत्त्वाची भूमिका निभावली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला होता. शर्मा यांनीच मद्यसम्राट विजय मल्या याच्याविरुद्धची लूक-आूट नोटील कमकुवत केली आणि त्याला देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, असा आरोपही राहुल यांनी शनिवारी केला होता. त्यांच्या या आरोपावर सीबीआयने आपली बाजू मांडली आहे.
सीबीआयमधील सदर अधिकाऱ्याचे नाव ए. के. शर्मा असे असून ते गुजरात श्रेणीचे अधिकारी आहेत. मल्या याच्याविरोधातील लूक-आऊट नोटीस कमकुवत करण्यामध्ये शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचप्रमाणे शर्मा यांनीच हिरेव्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, असा आरोप राहुल गांधी यांनी ट्वीटरद्वारे केला आहे.
बँकांचे कर्ज बुडविल्यानंतर मल्या यास देशाबाहेर पसार होण्यास नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मदत केल्याचा आरोप गांधी आणि काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून मल्या कसा पसार झाला त्याची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.