नवजात नातवाच्या दुधाचा खर्च भागवण्यासाठी ८० वर्षाच्या आजीने विकली जमीन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/GrandMother.jpg)
झारखंडमधील गुमला येथील एका ८० वर्षीय वृद्ध महिलेने नातवाच्या दुधाचा खर्च भागवण्यासाठी तिच्या मालकीची जमीन विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलगा आणि सुनेच्या मृत्यूनंतर अवघ्या काही महिन्यांच्या नातवाची जबाबदारी आजीच्या खांद्यावर आली. त्यात बाळ कुपोषित असल्याने तिने दुधाचा खर्च भागवण्यासाठी आणि उपाचारांसाठी जमीन विकली. सध्या बाळाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. आपल्या जमीन विकण्याच्या निर्णयामुळे नातू वाचल्याचा आनंद झाल्याचे ही आजी सांगते.
कलारा कल्लू असं या ८० वर्षाच्या महिलेचे नाव आहे. ‘न्यूज १८ हिंदी’शी बोलताना कलारा यांनी ‘नातवाला चांगलं दूध मिळावं आणि त्याच्यावर उपचार करता यावे म्हणून मी जमीन विकली. त्याला जिंवत ठेवणे माझ्यासाठी जमिनीच्या तुकड्यापेक्षा अधिक महत्वाचे होते,’ असं सांगितलं. ‘जमीन विकून जे पैसे आलेत त्यातून मी नातवाच्या दुधाचा आणि उपाचारांचा खर्च करत आहे. भविष्यामध्ये कोणीतरी मदत केली तर बरं होईल. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे माझ्या नातवाला नंतर कोण संभाळेल याचीच मला चिंता आहे,’ असंही त्यांनी म्हटलं.
रायडीह पोलीस स्थानक श्रेत्राअंतर्गत येणाऱ्या सनियाकोना गावच्या रहिवाशी असणाऱ्या कलारा यांच्या मुलाचे काही महिन्यापूर्वी निधन झाले. मुलाचे निधन झाले तेव्हा त्यांची सून गरोदर होती. मात्र मुलाच्या जन्माच्या वेळी तिचाही मृत्यू झाला. त्यामुळे या मुलाची जबाबदारी कलारा यांच्यावर आली. मुलगा आणि सुनेचे अचानक निधन झाल्याने घर चालवण्यासाठी उत्पन्नाचे साधन उरले नाही. नातवाला दूध आणण्यासाठीही कलारा यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळेच कलारा यांनी त्यांच्या नावावर असणारा जमीनीचा तुकडा विकला आणि त्यातून मिळालेला पैसा नातवासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांचा नातू गुमला येथील रुग्णालयातील कुपोषण केंद्रात आहे. कलारा यांनी कुपोषित परिस्थिती दाखल केलेल्या त्यांच्या नातवाची तब्बेतीमध्ये सुधारणा असल्याचे समजते.
‘या आजीने त्यांच्या नातवाला रुग्णालयात आणले होते तेव्हा त्याची प्रकृती खूपच नाजूक होती. मात्र आता त्याची तब्बेत बरीच सुधारली आहे’, असं रुग्णालयातील एका नर्सने सांगितले. कुपोषण केंद्रामधून या मुलाला डिसचार्ज मिळाल्यानंतर बाल कल्याण समितीमार्फत त्याचे पालन पोषण करण्याची व्यस्था केली जाणार असल्याचे समजते.