breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय
धक्कादायक! पत्नी आणि तीन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या
अलाहाबाद – उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि तीन मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (20ऑगस्ट) दुपारी हा संपूर्ण प्रकार घडला. मनोज कुशवाहा असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो पत्नी आणि तीन मुलींसोबत राहत होता. मात्र खूप वेळ त्याच्या घराचा दरवाजा बंद असल्याने शेजारच्यांना शंका आली आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी तो तोडून घरात प्रवेश केला. मात्र घरामध्ये पोलिसांना मनोज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तसेच त्याची पत्नी श्वेताचा मृतदेह हा फ्रिजमध्ये, मोठी मुलगी प्रीतीचा मृतदेह कपाटात, मधली मुलगी शिवानीचा मृतदेह सुटकेसमध्ये तर सर्वात लहान असलेल्या तीन वर्षीय श्रेयाचा मृतदेह हा जमिनीवर पडलेला आढळला. पोलिसांनी हे पाचही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मनोजने पत्नी आणि मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.