देशातील सर्वात लांब जोडपूल २५ डिसेंबरला खुला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/bridge.jpg)
आसाममधील बोगिबील रेल्वे- रस्ते पूल ४.९४ किलोमीटर लांबीचा
ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांना जोडणाऱ्या देशातील सगळ्यात लांब अशा रेल्वे- रस्ते पुलाचे (रेल- रोड ब्रिज) पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबरला उद्घाटन करणार आहेत. ४.९४ किलोमीटर लांबीचा हा बोगिबील पूल आसाम व अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात आहे. सुशासन दिन म्हणून साजऱ्या होणाऱ्या २५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुलाचे उद्घाटन करतील, अशी माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली.
माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी १९९७ साली या बोगिबील पुलाचे भूमिपूजन केले होते, मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर २००२ सालीच या पुलाचे काम सुरू झाले. गेल्या १६ वर्षांत या पुलाच्या बांधकामाची मुदत अनेकवेळा चुकल्यानंतर ३ डिसेंबरला या मार्गावर पहिली मालगाडी धावली. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत रसदपुरवठय़ात सुधारणा करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या पायभूत प्रकल्पांपैकी बोगिबील हा एक आहे.
यात ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किनाऱ्यावर ट्रान्स- अरुणाचल महामार्गाचे बांधकाम, तसेच या विशाल नदीवर व दिबांग, लोहित, सुबनसिरी व कामेंग या तिच्या उपनद्यांवर नवे रस्ते व रेल्वे मार्ग बांधण्याचा त्यात समावेश आहे. भारत व चीन यांच्यादरम्यान सुमारे ४ हजार किलोमीटरची सीमा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.