देशातील तीन विमानतळांवर निर्माण होणार नवे टर्मिनल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/CHENNAIAIRPORT-.jpg)
नवी दिल्ली : देशातील तीन विमानतळांवर नवे टर्मिनल उभारण्यात येणार आहेत. यासाठी ५,०८२ कोटी रुपयांची तरतूद करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. विमानतळांवरील पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या योजनेचा भाग म्हणून ही टर्मिनल उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चेन्नई, लखनौ आणि गुवाहाटी विमानतळांवर ही नवी टर्मिनल बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी अनुक्रमे २४६७ कोटी, १२३२ कोटी आणि १३८३ कोटी रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक उपसमितीने हा निर्णय घेतला.
नव्या टर्मिनलमुळे चेन्नई विमानतळाची प्रवासी वाहतुकीची क्षमता वार्षिक ३.५ कोटी होणार आहे. या विमानतळाची २०२७ पर्यंतची गरज भागवली जाणार आहे. लखनौची १.३६ कोटी आणि गुवाहाटी विमानतळाची क्षमता ९० लाख प्रवासी इतकी होणार आहे. येत्या दहा ते १५ वर्षांत देशातील विमान वाहतूकीची क्षमता एक अब्जापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले.