दिवाळीनिमित्त ऑनलाईन खरेदीवर सवलतींचा पाऊस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/online-4.jpg)
कपडय़ांपासून मोबाईलपर्यंत १० ते ९० टक्के सवलत
दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कंपन्या सज्ज झाल्या असून सर्वच ई कॉमर्स कंपन्यांनी विविध वस्तूंच्या खरेदीवर भरगोस सवलती दिल्या आहे. अगदी घरगुती वस्तूपासून सोन्याच्या वस्तूंवर तब्बल १० ते ९० टक्के सवलती देण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन खरेदीचा वाढत्या कलामुळे ई कॉमर्स कंपन्यांनीही सवलती दिलेल्या आहेत. कपडय़ामध्ये सर्वच प्रकारच्या कपडय़ांवर ४० ते ९० टक्के एवढी सवलत ई कॉमर्स वेब पोर्टलवर देण्यात आलेली आहे. घरगुती सामान आणि सजावटीच्या वस्तूंवर ६० टक्कय़ांपर्यंत सवलत दिलेली आहे. अनेक मोबाईल कंपन्यांवर ५० टक्के सवलतही दिलेली आहे.
दिवाळीमध्ये सोन्याचीसुद्धा खरेदी केली जाते. म्हणून काही ई कॉमर्स वेबसाईट्सने सोन्याची नाणी आणि बार विक्री सुरु केली आहे आणि त्यावर ७ टक्के सवलत देण्यात आली आहे. सध्या ग्रामीण जिल्हा स्तरावरून ५६ दशलक्ष ग्राहकांनी मे महिन्यापर्यंत, तर मोठय़ा शहरांतून ४.६ कोटी ग्राहकांनी खरेदी केलेली आहे. अशावेळी ई कॉमर्स कंपन्यांचे पुढचे लक्ष्य हे ग्रामीण, जिल्हा स्तरावरील २०० दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे असणार आहे. यामुळे ई कॉमर्सच्या विक्री केंद्रात स्थानिक दुकानदारांच्या वस्तू देखील विकण्यास सुरुवात होत आहे, अशी माहिती ऑनलाईन बाजारपेठेचे अभ्यासक नील सेनगुप्ता यांनी दिली. मात्र यातील अनेक ठिकाणची सवलत आभासी आहे.
आपल्याच संकेतस्थळावर किंवा दुकानात ग्राहकांचे लक्ष आकर्षक घेण्यासाठी मोठय़ा सवलती दिल्या जातात. उत्पादन खर्च अधिक कर, इतर खर्च पकडून किंमत वाढते. ही किंमत आणखी वाढवून मग त्यावर सवलत दिल्यामुळे ग्राहकांना सवलत मिळाल्याचा आनंद होतो आणि व्यावसायिकाला विक्री झाल्याचा आनंद होतो. काही ठिकाणी सवलत म्हणून भेट कूपन दिले जाते. मोफत वस्तू दिल्या जातात, भेट मिळते असे विपणन तज्ज्ञ आलोक त्रिवेदी यांनी सांगितले. तसेच एक्सचेंज ऑफर्सचे सर्व नियम वाचून समजून मगच व्यवहार करा असाही सल्ला त्यांनी दिला.