दलित मुख्यमंत्री झाल्यास आनंदच वाटेल- सिद्धरामय्या
बेंगळूरु – कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही आपली अखेरची निवडणूक असल्याचे जाहीर केले. चामुंडेश्वरी या आपल्या मतदारसंघामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. निवडणूकीनंतर कॉंग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्रीपदासाठी दलित उमेदवाराची घोषणा केली जाण्याच्या शक्यतेवर बोलताना आपल्याला आनंदच वाटेल, असेही सिद्धरामय्या म्हणाले. निवडणूकीमध्ये कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबर आघाडी करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वासही सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.
बहुतेक वाहिन्यांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीमध्ये खंडीत निकाल मिलण्याचे किंवा कॉंग्रेसचा पराभव होण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. मात्र हे “एक्झिट पोल’म्हणजे पुढील दोन दिवसांसाठी केवळ मनोरंजन आहे. ज्या माणसाला पोहता येत नाही, त्याने काठावर बसून आकडेवारी करून नदीची खोली सांगण्यासारखा हा प्रकार असतो. अशा शब्दामध्ये सिद्धरामय्या यांनी “एक्झिट पोल’ची खिल्ली उडवली.