दक्षिण चीन सागरातून चिनी क्षेपणास्त्रे गायब – इस्रायली एजन्सी
मॉस्को (रशिया) – दक्षिण चीन सागरातून चिनी क्षेपणास्त्रे गायब झाल्याचा दावा इस्रायलमधील एका गुप्तचर संस्थेने केला आहे. चीनने दक्षिण सागरात तैनात केलेली क्षेपणास्त्रे त्यांच्या जागेवरून गायब झाल्याचे वृत्त आयएसआय ( इमेज सेट इंटरनॅशनल) या गुप्तचर संस्थेने दिले आहे आणि आपल्या दाव्याच्या पुराव्यादाखल उपग्रह छायाचित्रे सादर केली आहेत.
चीनने दक्षिण चीन सागरात कृत्रिम बेटे निर्माण करून तेथे लष्करी तळ उभारले आहेत. दक्षिण चीन सागरात नाविक वाहतुकीसाठी आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्यास चीनने नकार दिला आहे. जे-12बी ही जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी एचक्यू-9बी क्षेपणास्त्रे चीनने दक्षिण सागरात तैनात केली होती. जे-12 बी ची मारक क्षमता 295 सागरी मैल आहे आणि एचक्यू-9बी ची मारक क्षमता 160 सागरी मैल आहे. ही विमाने, ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रांवर मारा करू शकतात.
दक्षिण चीन सागराच्या उत्तरमश्चिम किनाऱ्यावरील वुडी बेटांवर शस्त्रास्त्रे तैनात करणार असल्याची घोषणा चीनने 2016 मध्येच केली होती. मात्र सध्या त्यांची संख्या कमी झालेली आहे.
ही क्षेपणास्त्रे देखभालीसाठी तात्पुरती हलवण्यात आली असतील, असे नौदल तज्ज्ञ जी लिए यांनी बीजिंगमध्ये सांगितले आहे. गेल्या महिन्यातच चीनने दक्षिण सागरातील तीन तळांवर जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात केली होती. त्याबाबत अमेरिकेने जोरदार टीका केली होती. फिलिपाईन्स, तैवान, व्हिएतनाम आणि मलेशिया या क्षेत्रातील वेगवेगळ्या भागांवर आपला अधिकार सांगत असले तरी तो मानण्यास चीन तयार नाही.