थायलंडच्या गुहेतून आणखी चौघांना बाहेर काढले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/thai-team-.jpg)
चियांग राय : थायलंडमधल्या चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघाला बाहेर काढण्याची बचाव मोहिम पुन्हा सुरु झाली आहे. सोमवारी आणखी चार मुलांना गुहेबाहेर काढण्यात बचावपथकांना यश आले आहे. जगातील धोकादायक ऑपरेशनपैकी हे एक मिशन असून रविवारी चार मुलांना बाहेर काढण्यात आले होते. आतापर्यंत एकूण आठ मुलांची सुटका करण्यात आली आहे.
रविवारच्या तुलनेत बचाव मोहिमेतील सदस्यांची संख्या वाढवली आहे. रविवारी जे पाणबुडे गुहेमध्ये गेले होते त्यांनाच आजही कायम ठेवण्यात आले आहे कारण त्यांना गुहेची अचूक माहिती आहे असे थायलंड सरकारमधील मंत्र्यांनी सांगितले. दरम्यान ज्या मुलांना काल बाहेर काढण्यात आले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
थायलंडमधल्या वाईल्ड बोअर्स फुटबॉल संघातील १२ मुले त्यांच्या प्रशिक्षकासोबत २३ जूनला शनिवारी गुहा पाहण्यासाठी गेले होते. पण त्याचवेळी पावसाचा जोर वाढला आणि बाहेर येण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे ही मुले तिथे अडकून पडली. अखेर नऊ दिवसांनी तीन जुलैला या फुटबॉल संघाचा शोध लागला आणि बचाव मोहिमेला वेग आला.
पुरेशा ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी आणि अन्य तयारी करायची असल्याने रविवारी रात्री ही बचाव मोहिम थांबवण्यात आली होती. सर्व मुले बाहेर काढण्यासाठी किमान २ ते ४ दिवस लागू शकतात, अशी माहिती या मोहिमेत सहभागी एका लष्कराच्या कमांडरने दिली. बचाव पथकाने आपल्या योजनेची अनेकवेळा रंगीत तालीम घेतली होती.
जर आम्ही वाट पाहत राहिलो आणि जर पुन्हा एकदा पाऊस पडू लागला तर इतक्या दिवस पाणी काढण्यासाठी केलेली आमची मेहनत वाया जाईल, असे या मोहिमेच्या प्रमुखांनी सांगितले.ते म्हणाले, परिसरात पाणीपातळी वाढू शकते. जिथे मुले बसले आहेत. तो फक्त १० वर्ग मीटर इतका राहिला आहे. हवामान विभागाने देशात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यात मुलांना वाचवणे कठीण जाणार आहे.