‘त्या’ कैद्याने तुरुंगातून केलं फेसबुक लाइव्ह ; मुख्यमंत्र्यांना दिली धमकी
चंदीगढ : पंजाबमधील फरीदकोट तुरूंगात बंद असलेल्या एका कैदीने सुमारे तीन मिनिटे फेसबुकवर लाइव्ह येत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राज्याचे पोलीस महासंचालक सुरेश अरोरा आणि तुरूंग मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. गोविंद सिंग असे या कैद्याचे नाव आहे.
गोविंद सिंगने फेसबुकवर लाइव्ह येत अमरिंदर सिंग यांना धमकी देत तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे, अशी धमकीच दिली. भटिंडा येथील रॅलीदरम्यान अमरिंदर सिंग यांनी खोटे बोलल्याचा उल्लेख गोविंदने व्हिडिओत केला आहे. पंजाबमधील अंमली पदार्थाचा व्यवसाय पूर्णपणे संपुष्टात आणण्याचे वचन अमरिंदर सिंग यांनी या रॅलीत दिले होते. पण त्यांनी तसे केले नाही. अमरिंदर सिंग यांनी खोटे वचन दिल्यामुळे त्यांनी सुवर्ण मंदिरात जाऊन देवाची माफी मागायली हवी, असे त्याने या व्हिडिओत म्हटले आहे.
माझ्याकडे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांचा फोन नंबर उपलब्ध नसल्यामुळे मला फेसबुकवर लाइव्ह यावे लागल्याचेही त्याने म्हटले. जर माझ्याकडे त्यांचा फोन नंबर असता तर मी स्वत: त्यांना फोन केला असता, असे म्हणत त्याने तुरूंगातील गैरसुविधांचाही उल्लेख केला. अमरिंदर सिंग यांनी स्वत: येऊन तुरूंगाची पाहणी करावी. येथील गुरूद्वाराची काय स्थिती झाली हेही पाहावे, असे आवाहन त्याने केले. दरम्यान, गोविंद सिंगच्या या लाइव्ह व्हिडिओप्रकरणी पोलिसांनी गोविंद आणि त्याचा एक सहकारी कैदी कुलदीप सिंगविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गोविंद सिंग हा हत्या आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगत आहे.