‘ती’ महिला पोलीस ओरडत राहिली; मात्र, तरीही लोकांनी लाठीमार सुरुच ठेवला
तेलंगणातल्या आसिफाबाद जिल्ह्यातील सिरपूर कागज नगर येथील एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला पोलीस कर्मचाऱी ट्रॅक्टरवर उभे राहत संतप्त लोकांपासून वाचण्याचा प्रयत्न करीत असून लोक तिला काठ्यांनी बेदम मारहाण करीत आहेत. येथील मोकळ्या जागेवर वृक्षारोपणासाठी आलेल्या पोलिसांवर आणि वन कर्मचाऱ्यांवर ग्रामस्थांनी अचानक हल्ला चढवला होता.
एएनआयने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, पोलीस आणि वन कर्मचारी जेव्हा वृक्षारोपणासाठी सिरपूर कागजनगर येथे पोहोचले तेव्हा तेलंगाणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. यावेळी या कार्यकर्त्यांनी पोलिसांसह वन कर्मचाऱ्यांना अमानुषपणे मारहाण केली.
हा हल्ला अचानक आणि इतका जोरदार होता की, पोलिसांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. यांपैकी एक महिला पोलीस कर्मचारी झुंडीपासून वाचण्यासाठी एका ट्रॅक्टरवर चढली मात्र, या जमावातील लोकांच्या हातात मोठ मोठ्या काठ्या होत्या. या काठ्यांच्या सहाय्याने त्यांनी ट्रॅक्टरची तोडफोड करायला सुरुवात केली. तसेच या ट्रॅक्टरवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. ही मारहाण थांबवण्यासाठी ती ओरडत राहिली मात्र, लोकांना तिची कीव आली नाही.
या घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, लोकांनी पोलिसांवर हल्ला का चढवला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.