डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयाविरूद्ध टिकटॉक न्यायालयात जाणार
नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेल्या आदेशानुसार घातलेल्या निर्बंधांना टिकटॉक आता न्यायालयात आव्हान देणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे निर्बंध घालताना व्यक्त केलेल्या चिंता निराधार असल्याचे टिकटॉकने म्हटले आहे. ६ ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी आदेश काढून ४५ दिवसांची मुदत टिकटॉक खरेदी करण्यासाठी मायक्रोसॉफ्टला दिली होती. तोपर्यंत त्याच्या वापरावर बंदी घातली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेल्या आदेशात ४५ दिवसांत टिकटॉकबाबतचे सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करून ते विकत घेण्याची मुदत मायक्रोसॉफ्टला दिली होती. त्यानंतर त्यांनी ही मुदत ९० दिवसांपर्यंत वाढवली आहे. परंतु या कालावधीत या सर्व प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार नाही. काही कायदेशीर बाबींना वेळ लागतो. त्यामुळे हा व्यवहार पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी टिकटॉक वापरू नये, असा आदेश काढणे चुकीचे आहे, असे टिकटॉकने म्हटले आहे. त्यामुळे टिकटॉक ट्रम्प यांच्या या आदेशाला न्यायालयात आव्हान देणार आहे.