डिजिटल मॅपिंगद्वारे दहशतवाद्यांची धरपकड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/digital-.jpg)
श्रीनगर :काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सैन्याने आता गावांच्या डिजिटल मॅपिंगवर काम सुरू केले आहे. प्राथमिक टप्प्यात काही विशेष संवेदनशील भागांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. यात दक्षिण काश्मीरमधील गावांचे प्रमाण अधिक आहे. डिजिटल मॅपिंगद्वारे दहशतवाद्यांना घेरणे आणि त्यांचा नायनाट करण्यास सैन्याला मदत होणार आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांच्या विरोधात चालविल्या जाणाऱ्या मोहिमेत सैनिक अधिक सुरक्षित राहू शकणार आहेत.
काश्मीरच्या गावांचे मॅपिंग करण्यात आले असले तरीही ते कागदोपत्री स्वरुपात आहे. याला वेळोवेळी माहितीच्या आधारावर अद्ययावत केले जाते. मॅपिंगद्वारे दहशतवाद्यांना घेरण्यास संबंधित जागेची खरी स्थिती आणि नकाशाचा अंदाज येऊ शकतो. कॉर्डन अँड सर्च मोहीम राबविली जात असताना सैन्याला मॅपिंगद्वारे मदत मिळते. कुठल्या भागात शोध घ्यायचा याचा निर्णय घेणे मॅपिंगमुळे शक्य होते. तर कधी गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारावर सैन्य दहशतवाद्यांना घेरत असते, तेव्हा देखील दहशतवाद्यांना पळता येऊ ने याकरता मॅपिंगद्वारेच सैन्य पुढील व्यूहनीती आखत असते.
कागदोपत्री मॅपिंगच्या माध्यमातून सैन्याला मदत होते, परंतु मॅपिंग डिजिटल झाल्यास प्रत्येक तपशील विस्तृतपणे उपलब्ध होणार आहे. मोहिमेपूर्वी संबंधित भागाचा पूर्ण तपशील मिळाल्याने सैन्याला मोठी मदत होणार आहे. सध्या काश्मीर खोऱयाच्या काही गावांचे डिजिटल मॅपिंगचे काम सुरू झाले आहे. दहशतवाद्यांची आश्रयस्थाने ठरलेली तसेच मुलतत्ववादाचा अधिग पगडा असलेल्या भागांवर याकरता अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे.
संवेदनशील गावांमध्ये योजना राबविल्यावर डिजिटल मॅपिंगचा विस्तार केला जाईल. गुप्तचरांच्या माहितीवरून शोधमोहीम राबविण्यात आली असता संबंधित स्थानाची सैन्याला योग्य माहिती नसल्याचा लाभ दहशतवादी उचलतात. परंतु डिजिटल मॅपिंग पूर्ण झाल्यावर संबंधित ठिकाण पिनपॉइंट करून यशस्वी मोहीम राबविण्यास मदत होणार आहे.