‘ट्रेन १८’ला विद्युत निरीक्षकांची मंजुरी
नवी दिल्ली : रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी ‘ट्रेन १८’ला तीन दिवसांच्या तपासणीनंतर सरकारच्या विद्युत निरीक्षकांकडून मंजुरी मिळाली असल्याचे रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या गाडीला येत्या आठवडाभरात हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
या बहुप्रतीक्षित गाडीने तिच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर आणि रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी तिला सशर्त मंजुरी दिल्यानंतर गेल्या सुमारे महिनाभरापासून ती रखडली होती.
या अत्याधुनिक गाडीचे डिझाइन तयार करून तिचे उत्पादन करणाऱ्या रोलिंग स्टॉक विभागाच्या आक्षेपांनंतरही रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर ही गाडी सोमवारी विद्युत निरीक्षकांच्या तपासणीसाठी पाठवण्यात आली होती.
या तपासणीचा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठवण्यात येणार असून, त्यानंतर ही गाडी अधिकृतरीत्या केव्हा सुरू करायची याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. १६ डब्यांची ही गाडी ९७ कोटी रुपये खर्च करून १८ महिन्यांत तयार करण्यात आली असून, ती शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेणार आहे. ही देशातील पहिली इंजिनरहित रेल्वेगाडी आहे.