ट्रम्प-किम परिषदेसाठी सिंगापूरमध्ये जगभरातील 2500 पत्रकार
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातील शिखर परिषदेचे वार्तांकन करण्यासाठी जगभरातील 2500 पेक्षा अधिक पत्रकार सिंगापूरमध्ये हजर राहणार आहेत. शिखर परिषदेची तयारी उत्तम प्रकारे चालू असल्याचे डोनॉल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. एकदा रद्द होऊन पुन्हा निश्चित झालेली ही ऐतिहासिक परिषद सिंगापूरच्या सॅंटोसा बेटावरील रिसॉर्टमध्ये होणार असल्याचे सिंगापूर सरकारने काल जाहीर केले आहे.
शिखर परिषदेच्या तयारीसाठी अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या अनेक समित्यांच्या सतत बैठका चालू आहेत. येणारे काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. शिखर परिषदेसंबंधात बोलणी करण्यासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे या आठवड्यात व्हाईट हाऊसला भेट देणार आहेत.
शिखर परिषदेसाठी सिंगापूरला येणाऱ्या उत्तर कोरियाच्या प्रतिनिधी मंडळाचा खर्च अमेरिका करणार नसल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते हीथर नॉर्ट यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर कोरियाच्या प्रतिनिधी मंडळाचा खर्च अमेरिका करणार असल्याच्या बातम्या मीडियात येत आहेत, त्याबाबत त्यांनी हे स्पष्टीकरण केले आहे.
सिंगापूर येथे होणारी ट्रम्प-किम जोंग उन यांच्यातील शिखर परिषद ही एका प्रक्रियेची सुरुवात आहे. यातून मोठेसे काही साध्य होणार नाही, असे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ सिनेटर मार्को रुबियो यांनी म्हट्ले आहे.