ट्रम्प आणि किम यांची भेट 12 जूनला
उत्तर कोरियाच्या आण्विक निःशस्त्रीकरणाविषयी महत्वाची शिखर परिषद
वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची भेट 12 जूनला सिंगापूरमध्ये होणार असे निश्चित झाले आहे. ट्रम्प यांनीच या ऐतिहासिक भेटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या भेटीदरम्यानच्या चर्चेत उतर कोरियाच्या आण्विक निःशस्त्रीकरणाबाबत महत्वाची चर्चा होणार आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओ हे तीन अमेरिकनांना समवेत घेऊन मायदेशी परत आल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी भेटीचा तपशील जाहीर केला. उत्तर कोरियामध्ये ताब्यात ठेवलेल्या तीन अमेरिकनांची काल सुटका करण्यात आली होती. ऍन्ड्रयूज हवाई तळावर ट्रम्प यांनी या तिघांचे स्वागत केले आणि या तिघांच्या सुटकेबद्दल किम यांचे आभारही मानले. किम आणि आपल्या भेटीमध्ये जागतिक शांतता अबाधित राखण्याच्या दृष्टीने महत्वाची पावले टाकली जातील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
या चर्चेतील संभाव्य तपशीलाबाबत मात्र ट्रम्प यांनी सावध भूमिका घेतली आहे. या शिखर परिषदेच्या यशापयशाबाबत त्यांनी सकारात्मक सूर कायम ठेवला आहे. मात्र ही चर्चा निष्फळ ठरण्याची शक्यताही त्यांनी उद्धृत केली आहे. तिघा अमेरिकनांच्या सुटकेमुळे या शिखर परिषदेबाबत आपण सकारात्मक झालो आहोत, असेही ते म्हणाले.