टेक्सासच्या शाळेत विद्यार्थ्यांकडून गोळीबार ; 10 ठार
ह्युस्टन – अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातील एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात किमान दहा जण ठार झाल्याचे वृत्त आहे. सॅंटा फे हायस्कुल मध्ये हा प्रकार घडला. ही शाळा ह्युस्टन पासून 50 किमी अंतरावर आहे. हल्लेखोराने तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांवरही गोळीबार केल्याचे वृत्त असून त्यात एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला आहे पण तो फारसा गंभीर जखमी झाला नसल्याचे रूग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
आत्ता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ठार झालेल्या दहा जणांमध्ये नऊ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. या प्रकरणात एकूण दोन जणांना सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील दिमीत्रिओस पागोर्टझीस याने हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. त्याने आपल्या वडिलांच्या रिव्हॉल्वरच्या सहायाने हा गोळीबार केला असे सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर त्या शाळेच्या परिसरात पाईप बॉंबही फेकल्याचे वृत्त आहे.
तथापी त्यातील एकाही बॉंबचा स्फोट न झाल्याने जादा प्राणहानी टळली. गोळीबारात अन्य दहा विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील दोन विद्यार्थी गंभीर आहेत. गोळीबाराचे आवाज ऐकल्यानंतर शाळेत मोठ्या प्रमाणात पळापळही झाली. पालकही घाबरून पळून गेले. ही धक्कादायक घटना असल्याचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. शाळांमध्ये गोळीबार होण्याचे प्रकार आपल्या देशात वारंवार घडत असून हे भयानक आहे असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आपले प्रशासन सर्व शक्य ती उपाययोजना करीत आहे असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. अमेरिकेत मुक्त शस्त्रास्त्र परवाने देण्यात येतात. ती पद्धतच बंद करावी अशी मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष ट्रम्प यांनी या परवान्यांवर निर्बंध आणण्याऐवजी शाळेतील शिक्षकांनाच शस्त्रास्त्र परवाने देण्याचा प्रस्ताव मध्यंतरी मांडला होता.