टीडीपीने आंध्रात कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्यास फासावर लटकेन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/congress-tdp.jpg)
- उपमुख्यमंत्र्यांची टोकाची भूमिका
अमरावती – आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते के.ई.कृष्णा मुर्ती यांनी त्यांच्या पक्षाने कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. दोन्ही पक्षांमधील हातमिळवणी वास्तवात आल्यास फासावर लटकेन, अशी टोकाची भूमिका त्यांनी मांडली आहे.
टीडीपी आणि कॉंग्रेस एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे माझे वैयक्तिक मत नसून पक्षाची भूमिका आहे, असे मुर्ती येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. अर्थात, कुठल्या युतीचा किंवा आघाडीचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अलिकडेच कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला टीडीपीचे प्रमुख असणारे आंध्रचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एकत्र आले. याशिवाय, चंद्राबाबू आणि इतर काही नेत्यांनी मला कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याचा सल्ला दिल्याचा गौप्यस्फोट कुमारस्वामी यांनी केला. त्यामुळे टीडीपी आणि कॉंग्रेसमधील जवळीक वाढत असल्याची चर्चा आंध्रात रंगली आहे.
यापार्श्वभूमीवर, मुर्ती यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आहे. टीडीपी काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारमधून आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडला. आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकारकडून नकार आल्याने टीडीपीने ते पाऊल उचलले.