‘जेएनयू’च्या उमर खालिदवरील गोळीबार प्रकरणातील आरोपीला शिवसेनेने दिली उमेदवारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Uddv.jpg)
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्याचा आरोप असलेल्या नवीन दलाल याला शिवसेनेने निवडणुकीचे तिकीट दिले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्येही विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेने खालिदवर गोळीबार करण्याचा आरोप असणाऱ्या नवीनला तिकीट दिले आहे. येथील बहादुरगड मतदारसंघातून नवीन शिवसेनेच्या धुनष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.
‘मी सहा महिन्यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवाद आणि गौ संरक्षण हे माझे धोरण आहे,’ असं स्वत:ला गौरक्षक म्हणावणारा नवीन सांगतो. ‘राष्ट्रवाद, गाईंचे संरक्षण आणि आपल्या क्रांतीकारांना ओळख मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे,’ असं नवीनने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. भाजपा आणि काँग्रेस सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न, शहीदांचे प्रश्न, गाई आणि गोरगरिबांबद्दल कोणताही आस्था नसून त्यांना केवळ राजकारण करायचे आहे अशी टीका नवीनने केली आहे. नवीनला तिकीट देण्यात आल्याच्या वृत्तावर हरिणायातील दक्षिण विभागाचे शिवसेनेचे प्रमुख विक्रम यादव यांनी शिक्कामोर्तब केले आहे. ‘नवीन गौ संरक्षण, देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे काम करत आहे, म्हणून आम्ही त्याची निवड केली आहे,’ असं यादव सांगतात.