जपानकडून स्मार्टफोनच्या सुटय़ा भागांची दक्षिण कोरियाला होणारी निर्यात बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Untitled-1-1.jpg)
- ४ जुलैपासून अंमलबजावणी; जपानी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचे समभाग घसरले
युद्धकाळात जपानच्या काही कंपन्यांनी कोरियाच्या लोकांना सक्तीने कंपन्यात काम करायला लावल्याच्या प्रकरणातील जुना वाद चिघळला असून जपानने दक्षिण कोरियाला चिप, स्मार्टफोन सुटे भाग यांची निर्यात बंद केली आहे. ४ जुलैपासून हा निर्णय अमलात येत आहे. ही बातमी येताच सॅमसंगचा शेअर ०.७४ टक्के तर एलजीचा २.५२ टक्क्य़ांनी घसरला आहे. इलेक्ट्रॉनिक व मोबाईल सुटे भाग तयार करणाऱ्या जपानी कंपन्यांचे शेअरही घसरले आहेत.
दक्षिण कोरियाच्या न्यायालयांनी युद्धकाळात ज्या जपानी कंपन्यांनी कोरियन लोकांकडून सक्तीने काम करवून घेतले त्यांनी नुकसान भरपाई द्यावी असा निकाल दिला असून जपानने मात्र हा प्रश्न दशकापूर्वीच दोन्ही देशात राजनैतिक संबंध सुरू होताना संपला होता असा दावा केला आहे. जपानच्या आर्थिक, व्यापार व उद्योग मंत्रालयाने सांगितले,की दक्षिण कोरियाला काही महत्त्वाच्या भागांची निर्यात थांबवण्याचा निर्णय हा आंतरराष्ट्रीय संबंधांना अनुसरूनच घेतला आहे.
जपानने दक्षिण कोरियावर नवीन र्निबध घातले असून त्यात, तीन रसायने व इतर उत्पादन तंत्रज्ञान देण्यास मनाई करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाला जर चिप व स्मार्टफोनचे सुटे भाग निर्यात करायचे असतील तर त्याआधी परवानगी घेणे जपानी कंपन्यांना भाग आहे. चिपच्या निर्मितीत उपयोगी असलेल्या फ्लोरिनेटेड पॉलिमाइड या रसायनावर बंदी घालण्यात आली आहे. १९६५ मध्ये दोन देशात याबाबत करार झाला होता. स्थानिक व जपानी उद्योग यांनी भरपाईसाठी स्वेच्छा निधी उभारला असल्याचे स्पष्टीकरण जपानने दिले होते.
जपानी कंपन्यांना फटका?
जपानी कंपन्यांनी तयार केलेले सुटे भाग व इतर वस्तूंच्या एकूण निर्यातीत १० ते २० टक्के वाटा दक्षिण कोरियाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व मोबाईल उत्पादक कंपन्यांचा आहे. त्यामुळे जपानी कंपन्यांना या निर्यातबंदीचा मोठा फटका बसणार आहे.