चीन-नेपाळमध्ये 14 करार – रेल्वे आणि रस्तेनिर्मितीवर भर!
बीजिंग (चीन) – चीन आणि नेपाळमध्ये गुरुवारी 14 करार करण्यात आले आहेत. नेपाळमध्ये रेल्वे नेटवर्क उभारणे हा यातील अत्यंत महत्त्वाचा करार आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली हे सध्या चीन दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली, तेव्हा नेपाळच्या विकासात संपूर्ण सहकार्य देण्याचा विश्वास शी जिनपिंग यांनी केपी ओली यांना दिला.
चीन आणि नेपाळ यांच्यामध्ये गुरुवारी जे 14 करार झाले आहेत, त्यासंबंधात चिनी माध्यमांनी अधिक माहिती दिलेली नाही. मात्र दहा करारावंर आणि चार समझोता करारांवर सह्या झाल्याची आणि ऊर्जा सहकार्यावर सह्या झाल्याची माहिती नेपाळी वृत्तपत्र “काठमांडू पोस्ट’ ने दिली आहे.
यापुढे नेपाळला आपल्या हितासाठी तिबेटमधील महामार्गांचा वापर करता येणार आहे. नेपाळ आणि तिबेट रेल्वे मार्गाने जोडण्यात येणार आहेत. दोन देशांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याबरोबरच मानवी संसाधन विकासाबाबतही करार झालेला आहे. दोन देशांत बुधवारी 2.4 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 16,276 कोटी रुपयांच्या ज्या 8 करारांवर सह्या झाल्या आहेत. त्यातील काही करार पायाभूत सुविधाविकासासाठी आहेत. शी जिनपिंग यांनी या समझोत्यांद्वारे नेपाळला वन बेल्ट वन रोड परियोजनेत सामील करून घेत असल्याचे बुधवारी जाहीर केले.