चंद्रावर हेलियम-३ सापडल्यास २५० वर्षे इंधनाची चिंता मिटेल
नवी दिल्ली – पहिली मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता भारत चांद्रयान-२ मोहिमेची तयारी करत आहे. या मोहिमेत चंद्रावर हेलियम-३ शोधण्यासाठी खोदकाम केले जाणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, चंद्रावर हेलियम-३ सापडल्यास २५० वर्षे इंधनाची चिंता मिटेल, असे संशोधकांनी म्हटले आहे.
या मोहिमेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हेलियमच्या शोधासाठी खोदकाम केले जाईल. या आण्विक इंधनाची किंमत सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये प्रति टन इतकी आहे. जर चंद्रावर हेलियम-३ सापडले, तर त्यातील एक चतुर्थांश हेलियम पृथ्वीवर आणणे शक्य आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. दरम्यान, चंद्रावर सुमारे १० लाख मेट्रिक टन हेलियम-३ चा साठा आहे, असा दावा नासा या संस्थेने यापूर्वीच केला आहे. तर, १९७२ च्या अपोलो मोहिमेतही चंद्रावर हेलियम-३ असल्याचा दावा करण्यात आला होता. भारतासह अनेक देश आणि काही संस्थांनी चंद्रावर हेलियम-३ शोधण्याचे प्रयत्न चालवले आहेत.