कोरोना औषधावर संशोधन करणारे ३ संशोधक रात्रीत करोडपती बनले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Corona-testing-1.jpg)
लंडन – कोरोना औषधांवर संशोधन करणारे बिटनमधील तीन संशोधक रातोरात करोडपती झाले आहेत. प्रा. रटको जुकानोव्हिक, स्टीफन होलगेट आणि डोन्ना डेव्हिस अशी या संशोधकांची नावे आहेत.
ब्रिटनमधील साऊथ्म्टन विद्यापीठाच्या मेडिसीन स्कूलमधील हे तिन्ही प्राध्यापक आहेत. त्यांनी सिनेरजेन नावाची कंपनी स्थापन केली आहे. त्यांच्या या कंपनीच्या शेअरचा भाव आतापर्यंत तब्बल तीन हजार पटींनी वाढला आहे. या कंपनीत त्यांनी एका कोरोना प्रतिबंधक औषधाची चाचणी घेतली होती. रुग्णांना कोरोना प्रतिबंधक औषध देण्यात आले होते. त्यापैकी ७९ टक्के रुग्णांची गंभीरपणे आजारी पडण्याची शक्यता कमी झाली आहे.
अंदाजे २० वर्षांपूर्वी या संशोधकांनी इन्टरफेरोन बीटा नावाच्या प्रोटीनची दमा आणि क्रोनिक लंग डिसीजच्या रुग्णांमध्ये कमतरता असते, याचा शोध लावला होता. त्याच आधारावर त्यांनी औषध निर्मितीला सुरुवात केली. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये इंटरफेरोन बीटा या प्रोटीनचा समावेश असलेल्या एसएनजी ००१ या औषधाची निर्मिती केली. १०१ कोरोना रुग्णांवर याची चाचणी घेण्यात आली. तेव्हा या औषधाने कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २ ते ३ पटीने वाढले. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आणि या संशोधकांना १५ ते १६ कोटी मिळाले.