कॉंग्रेस आणि जेडीएसमधील संशयकल्लोळ वाढीला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/congress-jds-1-2.jpg)
- येडियुरप्पा-शहा भेटीने तर्क-वितर्कांना उधाण
बंगळूर – कर्नाटकच्या सत्तेतील भागीदार असणाऱ्या कॉंग्रेस आणि जेडीएस या पक्षांमधील संशयकल्लोळ वाढीस लागल्याचे चित्र आहे. अशातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांच्यात तातडीची बैठक झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
कॉंग्रेस आणि जेडीएसचा समावेश असलेले कर्नाटकमधील आघाडी सरकार फार काळ टिकणार का, हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. अशातच दोन्ही पक्षांमधील मतभेद दिवसागणिक पुढे येत आहेत. आता पूर्ण अर्थसंकल्प मांडण्यावरून दोन्ही पक्षांत तणातणी सुरू झाली आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांचा एक व्हिडीओ प्रादेशिक वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केला. सरकार पाच वर्षे टिकणे अवघड आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर काय होते ते पाहूया, असे सिद्धरामय्या त्या व्हिडीओत म्हणताना दिसतात. त्यामुळे कॉंग्रेस आणि जेडीएसमधील संशयाचे वातावरण आणखीच वाढण्याची शक्यता आहे.
सत्तारूढ आघाडीत अस्वस्थता पसरली असतानाच शहा यांची भेट घेण्यासाठी येडियुरप्पा यांनी अचानकपणे अहमदाबाद गाठल्याची माहिती पुढे आल्याने राजकीय चर्चांना आणखी तोंड फुटले. कॉंग्रेसचे काही नाराज आमदार येडियुरप्पा यांच्या संपर्कात असून भाजपमध्ये प्रवेश करण्यास तयार असल्याचे वृत्त आहे.
यापार्श्वभूमीवर, शहा आणि येडियुरप्पा यांची भेट झाल्याने आघाडीमधील अस्वस्थतेचा राजकीय लाभ उठवण्यासाठी भाजप मोर्चेबांधणी करत असल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. मात्र, गोंधळाच्या स्थितीचा आम्ही कुठला फायदा उठवणार नाही. आघाडीमधील घडामोडी आम्ही शांतपणे पाहू. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधील अधिकाधिक जागा जिंकण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक 29 जूनला होणार आहे. त्या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी शहांची भेट घेतली, असे येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.