केवळ क्षेपणास्त्रांच्या बळावर देशाचे रक्षण केले जाऊ शकत नाही-एहसान इक्बाल
इस्लामाबाद : राजकीय अस्थिरतेमुळे भूतकाळात पाकिस्तानने आर्थिक विकासाच्या अनेक संधी गमाविल्या आहेत. अर्थव्यवस्था भक्कम नसताना केवळ रणगाडे आणि क्षेपणास्त्रांच्या बळावर देशाचे रक्षण केले जाऊ शकत नसल्याचे महत्त्वपूर्ण विधान तेथील गृहमंत्री एहसान इक्बाल यांनी केले आहे. त्यांचे हे विधान पाकिस्तानला एकप्रकारे घरचा अहेर मानले जात आहे.
1991 मध्ये भारताचे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानी अर्थमंत्री सरताज अजीज यांच्या आर्थिक सुधारणा धोरणांचा स्वीकार केला होता, असा दावा देखील इक्बाल यांनी केला. मनमोहन यांनी भारतात याबद्दलचे धोरण यशस्वीपणे लागू केले. बांगलादेशने देखील या धोरणांचा यशस्वी स्वीकार केला, परंतु पाकिस्तान स्वतःच्याच्या योजनांचा वापर राजकीय अस्थिरतेमुळे करू शकला नसल्याचे इक्बाल म्हणाले.
नियोजन आणि विकास मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱया इक्बाल यांनी पाकच्या नॅशनल सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी हे विधान केले. आमच्या मागे राहिलेले अनेक देश आता खूप पुढे निघून गेल्याने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.