केरळमधील 900 डॉक्टरांचा राजीनामा, पगार कपातीचा केला निषेध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/doctors-4555_201906253894.jpg)
केरळ – कोरोना विषाणूच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्या 900 डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. पगार कपातीचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. हे डॉक्टर कोविड सेंटरमध्ये काम करत होते. या वर्षी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या 1080 MBBS डॉक्टरांना कोरोना ड्युटीवर नेमण्यात आले होते. राजीनामा देणारे 900 डॉक्टर हे याच तुकडीतील आहे. या डॉक्टरांना 42 हजार रुपये महिना वेतन देण्यात येणार होते. मात्र त्यात कपात करून 27 हजार रुपये वेतन देण्यात आलं.
केरळमधील ज्युनिअर डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ उस्मान हुसेन यांनी सांगितले की या डॉक्टरांच्या पगारातील 8400 रुपये पगार देण्यात येणाऱ्या अडचणींच्या नावाखाली कापण्यात आले होते. याशिवाय टीडीएस आणि इतर कराची रक्कमही या रकमेतून कापण्यात आली होती. सगळं वगळून डॉक्टरांच्या हाती 27 हजार रुपये आले होते. या ज्युनिअर डॉक्टरनी तिथले मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना पत्र लिहून या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
केरळमध्ये 19904 कोरोनाग्रस्त रुग्णालयात आहेत. 1,96,582 जणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. केरळमध्ये कोरोनाची लागण झालेल्या नव्या रुग्णांमध्ये 14 रुग्ण हे विदेशातून आलेले आहेत. 36 रुग्ण हे इतर राज्यातून आलेले आहेत तर 1059 रुग्ण हे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याने बाधित झालेले आहेत.