breaking-newsराष्ट्रिय

केंद्र सरकारच्या अध्यादेशांविरोधात हरियाणाच्या पिपली गावात शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन

पानीपत – देशभरातील शेतकऱ्यांना जाचक ठरतील असे तीन अध्यादेश केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केले आहेत. या जाचक अध्यादेशांना विरोध करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी हरियाणाच्या पिपली गावात एकत्र येत आंदोलन केले. भारतीय किसान संघ आणि अन्य शेतकरी संघटनांनी केलेल्या या आंदोलनामुळे पिपली राष्ट्रीय महामार्ग बराच काळ ठप्प झाला होता. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडूनही यावेळी दगडफेक करण्यात आली.

केंद्र सरकारने व्यापारी मंडईच्या बाहेरही व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा कृषी माल विकत घेण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर डाळी, बटाटे, कांदे, धान्य आणि खाद्यतेलांना जीवनावश्यक वस्तू नियमातून बाहेर काढले असून कृषीमालाच्या साठेबाजीचीही मर्यादा उठवली आहे. तसेच कंत्राटी शेतीला समर्थन देण्याचे धोरण अंमलात आणण्याच्या नीतीवर काम सुरू केले आहे. हे तिन्ही कायदे देशातील बळीराजाच्या हिताला बाधक असल्याने ‘किसान बचाओ, मंडी बचाओ’ ही रॅली काढत शेतकरी संघटनांनी हरियाणातील पिपली गावात एकत्र येत रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पिपली राष्ट्रीय महामार्ग 44 अडवून धरला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांत बाचाबाची झाली. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांकडूनही दगडफेक करण्यात आली. या लाठीचार्ज आणि दगडफेकीत काही पोलिसांसह आंदोलक जखमी झाले. तर दगडफेकीत काही गाड्यांचेही नुकसान झाले.

अध्यादेश मागे न घेतल्यास 15 सप्टेंबरपासून धरणे आंदोलन
मंडईत शेतकरी आंदोलकांना संबोधित करताना भारतीय शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुरनाम सिंह चढुनी यांनी सांगितले की, सरकारने अन्नदात्या शेतकऱ्यावर लाठीचार्ज करून चांगले केले नाही. आता आम्ही सरकारला चार दिवसाचा अल्टिमेटम देत आहोत. चार दिवसात सरकारने तिन्ही अध्यादेश मागे घेण्याचे मान्य केले नाही तर राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यात मंगळवार 15 सप्टेंबरपासून शेतकरी धरणे आंदोलनाला सुरुवात करतील, असा इशारा त्यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button