कॅनडातील स्फोटप्रकरणी दोन संशयितांचा शोध सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/indo-2.jpg)
टोरोंटो – कॅनडातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी पोलिसांकडून दोन संशयितांचा शोध घेतला जात आहे. या दोघांनी मिळून गुरुवारी रात्री ओन्टारियो प्रांतातील “बॉम्बे भेल’ या भारतीय रेस्टॉरंटमध्ये स्फोट घडवला होता. चेहरा झाकलेले दोघेजण या रेस्टॉरंटमध्ये शिरताना सीसीटिव्हीमध्ये दिसले आहे. या दोघांनीच रेस्टॉरंटमध्ये स्फोटके ठेवली आणि तेथून पळून गेले होते. या स्फोटामध्ये 15 जण जखमी झाले होते.
स्फोट झालेले रेस्टॉरंट हे राजधानी टोरोंटोपासून 28 किलोमीटर अंतरावरील मिसिस्सॉगा येथे आहे. या स्फोटाबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेउ यांनी ट्विटरवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या हिंसेमध्ये जखमी झालेल्यांबद्दल आम्हाला पूर्ण सहवेदना आहे. हे जखमी लवकर बरे व्हावेत अशी आमची ईच्छा आहे. या संदर्भात पोलिस आणि अधिकारी वेगाने तपास करत आहेत, असे ट्रुडेउ यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
हा स्फोट दहशतवादी कृत्य म्हणून घडवण्यात आल्याचा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही, असे पील विभागाच्या पोलिस प्रमुख जेनिफर इव्हान्स यांनी सांगितले. मात्र या संदर्भातील सर्व शक्यता गृहित धरलेली आहे, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात प्रमुख संशयित असलेल्या दोघा तरुणांना शोधण्यास पोलिसांनी प्राधान्य दिले आहे.