कहर…! टेस्ट ट्युबने झाला सीता जन्म -दिनेश शर्मांचा अजब शोध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/dinesh-sharma_2.jpg)
नवी दिल्ली : त्रिपुरातले मुख्यमंत्री विप्लव देव यांच्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. मथुरा येथे साजरा होत असलेल्या हिंदी पत्रकारिता दिवसाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सीतेचा जन्म मातीच्या भांड्यामध्ये झाला होता. म्हणजेच त्यावेळी टेस्ट ट्युबने मुलांना जन्म देण्याची पद्धत प्रचलित होती. त्यामुळे सीतेचा जन्मसुद्धा टेस्ट ट्युबने झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
रामायण काळात माता सीतेचा जन्म एका मातीच्या भांड्यात झाला होता. त्यामुळे रामायण काळापासून टेस्ट ट्युब बेबीची पद्धत अस्तित्वात होती. इतक्यावरच न थांबता महाभारत आणि रामायण काळाचा हवाला देत त्यांनी भगवान नारदमुनी पत्रकार असल्याचेही म्हटले आहे. हिंदी पत्रकारिता दिवसाच्या निमित्ताने बोलताना ते म्हणाले, पत्रकारितेची सुरुवात आधुनिक काळात नव्हे, तर महाभारत काळापासून चालत आलेली आहे. महाभारत काळाचे ज्ञानामृत पाजताना ते म्हणाले, गुरुत्वाकर्षण शक्ती, प्लॅस्टिक सर्जरी आणि आण्विक शोध कुठे दुसरीकडे नाही, तर भारतात लागला आहे. तसेच महाभारत काळातही टेक्नॉलॉजी उपस्थित होती. त्यासाठी दिनेश शर्मा यांनी संजय आणि धृतराष्ट्राचे उदाहरण दिले आहे.
त्या काळातही लाइव्ह टेलिकास्ट होत असल्यानं हस्तिनापुरात बसून संजयने कुरुक्षेत्रात होत असलेले महाभारतातले युद्ध पाहिले आणि त्याचा इतिवृत्तांत धृतराष्ट्र महाराजांना कथन केला. तर गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी महाभारत काळातही इंटरनेट आणि उपग्रह होते, असा चमत्कारिक दावा करून चर्चेत आले होते. एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधाने करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी मिस वर्ल्डमधल्या इंडियन ब्यूटीवरूनही वादग्रस्त विधान केले होते.