कर्नाटकात सरकार पाडण्यासाठी भाजपाचे ‘ऑपरेशन लोटस’, काँग्रेसचे तीन आमदार मुंबईत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/yedi-shivakumar.jpg)
कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून ‘ऑपरेशन लोटस’ सुरु आहे असा आरोप कर्नाटकचे जलसिंचन मंत्री डी.के.शिवकुमार यांनी केला आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजपा नेत्यांसोबत आहेत असा दावा शिवकुमार यांनी केला. राज्यात घोडेबाजार सुरु आहे. आमचे तीन आमदार मुंबईत हॉटेलमध्ये असून भाजपा आमदार आणि नेते त्यांच्यासोबत आहेत.
काय सुरु आहे आणि आमदारांना काय-काय प्रलोभने दाखवली जात आहेत त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे असे शिवकुमार म्हणाले. २००८ साली कर्नाटकात तत्कालिन येडियुरप्पा सरकार टिकवून ठेवण्यासाठी त्यावेळी भाजपाने विरोधी पक्षाच्या काही आमदारांना प्रलोभन, आमिषं दाखवली होती ते ‘ऑपरेशन लोटस’ म्हणून ओळखले जाते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
शिवकुमार यांना काँग्रेसचे संकटमोचक म्हटले जाते. मागच्यावर्षी राज्यात जेडीएस-काँग्रेस सरकार स्थापन करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्यावर भाजपाबद्दल सौम्य भूमिका स्वीकारल्याचा आरोप केला. आमचे मुख्यमंत्री भाजपाबद्दल थोडे सौम्य आहेत. त्यांना जे सत्य माहित आहे ते सर्वांसमोर त्यांनी उघड केलेले नाही या अर्थाने मी त्यांना सौम्य म्हटले.