कठुआ सामूहिक बलात्कार केसची सुनावणी काश्मीरच्या बाहेर – सर्वोच्च न्यायालय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/supreme-court-2.jpg)
नवी दिल्ली – कठुआ सामूहिक बलात्कार केसची सुनावणी जम्मू-काश्मीरच्या बाहेर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 8 वर्षांच्या एका निष्पाप बालिकेवर बलात्कार करणे, तिचा छळ करणे आणि हत्या करण्याबाबतच्या या केसची सुनावणी जम्मू-काश्मीर राज्याच्या बाहेर करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका पीडित मुलीच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे.
आता या केसची सुनावणी पंजाबमधील पठाणकोटमध्ये द्रुतगती पद्धतीने, दररोज आणि बंद खोलीत करण्यात येणार आहे. या संदर्भात कोणत्याही उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारची सुनावणी करू नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. भय आणि निष्पक्ष न्याय एकत्र राहू शकत नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
आठ हिंदूंना या प्रकरणी अटक केल्यानंतर दक्षिणपंथी गट आणि वकिलांनी त्याचा निषेध केल्यानंतर हे प्रकरण अधिक चर्चेत आले होते. या आठही जणांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. या आठ जणात एक निवृत्त सरकारी अधिकारी, चार पोलीस अधिकारी आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे. भटक्या मुस्लीम जमातीच्या मुलीचा मृतदेह 17 जानेवारी रोजी कठुआजवळ सापडला होता. तिच्या शरीरावर असलेल्या जखमांच्या माहितीने सर्वांना धक्का बसला होता. निषेध मोर्चात भाजपाच्या दोन मंत्र्यांच्या सहभागाने या प्रकरणाबाबत प्रचंड लोकक्षोभ उसळला होता.