कंगाल असूनही पाकिस्तान अणुबॉम्बच्या प्रेमात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/ANUBOMB.jpg)
पाकिस्तान सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. जगातील विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडे पैशांसाठी हात पसरतोय.पण या परिस्थितीतही पाकिस्तान सातत्याने आपल्या सैन्य दलांचा विस्तार करत आहे. खासकरुन अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांची संख्या वाढवत आहे. पाकिस्तानची परराष्ट्र आणि संरक्षण धोरण ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानी लष्कराने मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात इम्रान खान सरकार सत्तेवर आल्यानंतर आपली पकड अधिक बळकट केली आहे असे संरक्षण मंत्रालयाने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानने त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या ताफ्यात अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्राची संख्या मोठया प्रमाणात वाढवली आहे. पाकिस्तानकडे सध्याच्या घडीला १४० ते १५० अण्वस्त्र आहेत असे संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. अॅटोमिक शास्त्रज्ञांच्या बुलेटीननुसार सध्या ज्या वेगाने पाकिस्तान अण्वस्त्र तयार करत आहेत तोच वेग कायम राहिला तर २०२५ पर्यंत पाकिस्तानकडे २२० ते २५० अणवस्त्र असू शकतात.
अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात पाकिस्तानने उत्तर कोरिया आणि चीनच्या सहकार्याने ही प्रगती साध्य केली आहे. भारत विरोधी दहशतवादी गटांना पाकिस्तानी लष्कराने नेहमीच पाठिंबा दिला आहे. शेजारी देशांवर हल्ले करणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांवर कारवाई टाळण्याकडे पाकिस्तानचा कल असतो असे संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. भारतावर वचक ठेवणे हेच पाकिस्तानचे अण्वस्त्र कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्टय आहे. पाकिस्तानने अनेक वेळा अण्वस्त्र हल्ल्याचीही धमकी दिली होती. पण भारताने सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक करुन पाकिस्तानच्या अण्वस्त्राच्या धमकीला महत्व देत नसल्याचे दाखवून दिले आहे.