ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय तरुणाच्या हत्येप्रकरणी युवतीवर आरोपपत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/rathod-.jpg)
मेलबर्न – ऑस्ट्रेलियामध्ये ऑगस्ट महिन्यात भारतीय युवकाच्या हत्येप्रकरणी एका विशीतील मुलीवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. सनबरी येथे मौलिन राठोड या युवकावर घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान मौलिनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जेमी ली डोल्हेगे नावाच्या 18 वर्षीय युवतीला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे.
जेमीला मेलबर्नच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. तिच्यावर हत्येचा प्रयत्न, हेतूपुरस्सर गंभीर दुखापत करणे आणि बेपर्वाईने गंभीर ईजा करण्याचे आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. तिला 19 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. “डेटिंग ऍप’च्या माध्यमातून या मुलीने मौलिनशी संपर्क साधला होता. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणी भारतीय दूतावासाने पाठपुरावा केला होता.
मौलिन राठोडच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मौलिनचा मृतदेह भारतात परत पाठवण्यासाठी विशेष कायदेशीर सहाय्य घेतले जात आहे. मौलिन चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्यासाठी आला होता.