उत्तर प्रदेशचे खासदार साक्षी महाराजांना पाकिस्तानातून ठार मारण्याची धमकी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/SAVE_20200812_114204.jpg)
उन्नाव – उत्तर प्रदेशच्या उन्नाव मतदारसंघातील खासदार आणि भाजपा नेते साक्षी महाराज यांना पुन्हा एकदा जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या एका मोबाईल क्रमांकावरून ही धमकी देण्यात आली असून या संदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रार करून धमकीला गंभीरतेने घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
साक्षी महाराज यांनी सांगितले की, सोमवारी एका पाकिस्तानी क्रमांकावरून मला फोन आला. आमचा मित्र मोहम्मद गफ्फार याला पकडून तुम्ही आपल्या मृत्यूला निमंत्रण दिले आहे. दहा दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू. मी आणि माझे मुजाहिद्दीन तुमच्यावर 24 तास नजर ठेऊन आहेत. ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवाकडे पाठवू. आमच्याकडे तुमच्या सर्व कार्यक्रमांची माहिती आहे, असे धमकी देणाऱ्याने आपल्याला म्हटल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अयोध्येत राम मंदिर निर्माणासंबंधी अयोध्या तुर्की बनेल, पुन्हा एकदा बाबरी मशीद उभी राहिल, काश्मीर लवकरच पाकिस्तान बनेल, गजवा-ए -हिंद होणार असेही धमकी देणाऱ्याने म्हटल्याचे साक्षी महाराज यांनी सांगितले.
Sharing is caring!