उत्तर कोरियात वार्षिक अमेरिकाविरोधी रॅलीचे आयोजन नाही
प्यांग्योंग (उत्तर कोरिया) – या वर्षी उत्तर कोरियाने 25 जून रोजी वर्षिक अमेरिका विरोधी रॅलीचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनॉल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यातील शिखर परिषदेनंतर दोन देशातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आहे. गेल्या वर्षी प्यांग्योंग येथे दुसरा किम सुंग चौकात आयोजित अमेरिकाविरोधी रॅलीमध्ये एक लाखापेक्षा अधिक नागरिकांनी भाग घेतला होता. तेव्हा या दिनानिमित्त एक खास अमेरिकाविरोधी टपाल तिकिटही जारी करण्यात आले होते. अमेरिकन साम्राज्यवादाचा विरोध म्हणून या रॅलीचे आयोजन करण्यात येते.
कोरियन युद्धाच्या युद्धाची सुरुवात झाल्याचा दिवस अमेरिकाविरोधी रॅली आयोजित करून पाळण्यात येतो आणि या रॅलीचा शेवट 27 जुलै रोजी कोरियन स्वातंत्र्य दिनाच्या रूपात साजरा करण्यात येतो. अमेरिका विरोधी रॅली दिवस हा उत्तर कोरियाच्या कॅलेंडरमधील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस मानण्यात येतो.
1950 ते 53 या काळातील कोरियन युद्ध आणि अमेरिका आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांनी केलेल्या कोरियाच्या विध्वंसाची माहिती प्रत्येक कोरियन व्यक्तीला शिक्षणातूनच देण्यात आली आहे. शालेय पुस्तकातही अमेरिकन म्हणजे मोठ्या गालांचे पिशाच्च अशा स्वरूपात दाखवले जातात. अमेरिकन अत्याचाराच्या कथा लोकांच्या मनात ताज्या आहेत. हा सारा अमेरिका द्वेष लोकांच्या मनातून दूर करणे हे एक कठीण काम आहे. मात्र त्याची सुरुवात अमेरिका विरोधी रॅलीचे आयोजन न करून झालेली आहे.