उत्तर कोरियात पहिला रुग्ण सापडताच देशभरात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
हॅमहंग – जगभरातील कोरोना संकटाला कारणीभूत ठरलेल्या चीनचा जिगरी दोस्त मानल्या जाणाऱ्या उत्तर कोरियालाही आता कोरोनाचा झटका बसला आहे. उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण आढळल्याचे कळताच या देशाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी थेट देशभरात राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. तसेच किम यांनी स्वतःच्या देशात पहिल्यांदाच मास्कच्या सक्तीचे फर्मान काढले असून मास्क न घालणाऱ्यास दंड नव्हे तर थेट सक्त मजुरीची शिक्षा देण्याचे फर्मान काढले आहे.
उत्तर कोरियात आढळलेला कोरोना संशयित रुग्ण दक्षिण कोरियातून बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून उत्तर कोरियात आला आहे. या व्यक्तीला तीन वर्षांपूर्वी देशद्रोही ठरवून देश सोडण्यास भाग पाडले होते. या घटनेनंतर आमच्या उत्तर कोरिया देशात जीवघेणा कोरोना व्हायरस पसरविण्याचा हा प्रयत्न करण्यात आला असल्याचा संशय उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे उत्तर कोरिया इतर देशांप्रमाणे फक्त फर्मान काढून मोकळा झाला आहे असेही नाही. तर लोक प्रत्यक्षात मास्क घालत आहेत की नाही, यावर नजर ठेवण्यासाठीच स्वतंत्र तुकड्या नियुक्त केल्या आहेत. या तुकड्यांना वेगवेगळ्या शहरात गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांवर नजर ठेवण्याचे काम दिले आहे. दुसरीकडे उत्तर कोरियात एकही रुग्ण नसल्याचे सांगितले जात असले तरी किम जोंग उनच्या सरकारवर सुरुवातीपासून माहिती लपवल्याचा आरोप होत आहे. कारण उत्तर कोरिया चीनच्या सीमेला लागून असलेले एक हुकुमशाही राष्ट्र आहे. उत्तर कोरिया आणि चीनमध्ये तब्बल १४०० किलोमीटरची सीमासुद्धा आहे. विशेष म्हणजे दक्षिण कोरिया हे उत्तर कोरियाच्या पल्याड असल्यामुळे दक्षिण कोरिया आणि चीनच्या सीमा लागून आहे. तरी सुद्धा दक्षिण कोरियात १४ हजार रुग्ण आहेत आणि उत्तर कोरियात एकही रुग्ण नाही. मात्र आता एक संशयित रुग्ण आढळल्याची माहिती जगाला कळताच या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
आता कोरोना फैलावाच्या ७ महिन्यानंतर उत्तर कोरियात पहिल्यांदाच मास्कची सक्ती आणि रुग्ण सापडू लागले तर त्यांच्यासाठी क्वारंटाईन सेंटरसुद्धा उभारले गेले आहेत. सुरुवातीच्या काळात उत्तर कोरियात कोरोनाचे रुग्ण सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र उत्तर कोरियाने त्या फेटाळून लावल्या. त्यानंतर खुद्द किम जोंग दोन आठवडे गायब झाले. तेव्हा किम जोंगनासुद्धा कोरोना झाल्याची चर्चा होती. कारण ते स्वतः चेनस्मोकर आहेत. म्हणून त्यांना विलग केल्याचे बोलले जात आहे. त्या दोन आठवड्यांच्या काळात किम जोंग यांची बहिण किम यो जाँग उत्तर कोरियाचा कारभार पाहत होती. मात्र किम जोंग परतल्यानंतर आता उत्तर कोरियात कोरोनासाठी निर्बंध घातले जात आहेत. सर्वात उशिराने मास्कची सक्ती करणारा उत्तर कोरिया हा जगातला एकमेव देश आहे.