उत्तरप्रदेशला पुन्हा पावसाचा फटका ; 16 जणांचे बळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/heavy-rain-fall-.jpg)
लखनौ- उत्तरप्रदेशला पुन्हा पावसाचा जोरदार फटका बसला असून त्यामुळे ठिकठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये एकूण 16 जणांचे बळी गेल्याचे वृत्त आहे. तर बारा जण जखमी झाले आहेत. उत्तरप्रदेशात येत्या दोन दिवसांत विविध ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काल शनिवारपासून हा पाऊस पडत आहे त्याचा सर्वाधिक फटका शहाजाहानपुरला बसला. तेथे वीज अंगावर पडून सहा जण दगावले. सीतापुर जिल्ह्यात तीन जण मरण पावले आहेत.
अमेठी आणि औरिया येथेही प्रत्येकी दोन जण दगावले आहेत. विविध भागात हजाराच्या आसपास घरांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पशुधनाचीही मोठी हानी झाल्याचे सांगण्यात येते. ललितपुर जिल्ह्यात तालबेहात तालुक्यातील एक खेडे पुराच्या पाण्यात पुर्ण वेढले गेले आहे तेथील लोकांच्या मदतीसाठी हवाईदलाची टीम पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. झांशी जिल्ह्यात बेतवा नदीत अडकून पडलेल्या आठ मच्छिमारांच्या सुटकेसाठीही हवाईदलाची मदत घेण्यात आली आहे.