ईदच्या निमित्ताने अफगाणिस्तानची तालिबानशी शस्त्रसंधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Flag_of_Afghanistan.png)
- इस्लामिक स्टेटविरोधातील कारवाई सुरुच राहणार
काबुल – ईदच्या निमित्ताने अफगाणिस्तानमध्ये तालिबानबरोबर एक आठवड्याची शस्त्रसंधी जाहीर केली आहे. मात्र इस्लामिक स्टेट आणि अन्य दहशतवादी संघटनांविरोधातील कारवाई या काळातही सुरुच राहतील, असे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. रमजान महिन्याच्या 27 व्या दिवसापासून ईद उल फित्रच्या पाचव्या दिवसापर्यंत म्हणजे 12 ते 19 जूनपर्यंत ही शस्त्रसंधी असेल, असे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशर्रफ गनी यांनी अधिकृत ट्विटर संदेशात म्हटले आहे.
या शस्त्रसंधीबाबत तालिबानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अमेरिकेने 2001 साली अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर सरकारच्यावतीने प्रथमच ईदच्या निमित्ताने शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या या घोषणेबाबत तालिबानच्या म्होरक्यांची मते तपासली जात आहेत, असे तालिबानचा प्रवक्ता झाबिहुल्लाह मुजाहिद याने सांगितले.
काबुलमध्ये धर्मगुरुंच्या संमेलनाजवळच आत्मघातकी बॉम्बस्फोटाच्या दोनच दिवसांनी ही शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे त्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या संमेलनात वरिष्ठ धर्मगुरुंनी शस्त्रसंधीचे आवाहन केले होते. तसेच आत्मघातकी हल्ल्यांविरोधात फतवाही जारी केला होता. हा फतवा जारी केल्यानंतर तासाभरातच झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 7 जण ठार झाले होते.
फेब्रुवारी महिन्यात अध्यक्ष गनी यांनी तालिबानबरोबर चर्चेचा प्रस्ताव खुला केला होता. तालिबानला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याची तयारीही त्यांनी दाखवली होती. त्याला तालिबानकडून अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. पण हा प्रस्ताव फेटाळण्याच्या हेतूने अधिक हल्ले करण्याची घोषणाही केली होती.