इस्रायलचा माजी मंत्री निघाला इराणचा हेर
जेरूसलेम : इस्रायलचे माजी ऊर्जामंत्री गोनेन सेगेव्ह यांना इराणसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. नायजेरियात असताना इराणच्या गुप्तचर यंत्रणेसाठी सेगेव्ह यांनी काम केल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. इस्रायल पोलिसांच्या मागणीनुसार त्यांना गिनी येथून प्रत्यार्पित करण्यात आले. जेरूसलेम न्यायालयात त्यांच्यावर शत्रूदेशाला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला.
पेशाने डॉक्टर असणारे 62 वर्षीय सेगेव्ह इस्रायलचे ऊर्जामंत्री राहिले आहेत. त्यांना 2005 मध्ये अमली पदार्थांची तस्करी आणि बनावट पारपत्राप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा झाली होती. तसेच त्यांचा वैद्यकीय परवाना देखील रद्द करण्यात आला होता. परंतु 2007 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली, ज्यानंतर ते नायजेरियात डॉक्टर म्हणून काम पाहत होते.
सेगेव्ह 2012 मध्ये नायजेरियाच्या इराणच्या दूतावासातील अधिकाऱयांच्या संपर्कात आले. त्यांनी हँडलर्सची भेट घेण्यासाठी दोनदा इराणला भेट दिली होती. सेगेव्ह यांनी इराणला अत्यंत महत्त्वाची गोपनीय माहिती पुरविली.