इन्फोसिसलाही मंदीचा फटका; वरिष्ठ अधिकारी, मध्यम स्तरावरील कर्मचारी कपात करणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/Infosys-1.jpg)
भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसही आता मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करणार आहे. ज्या प्रकारे कॉग्निझंट या आयटी कंपनीने नुकतीच आपली कामगार कपात केली त्याच पद्धतीने इन्फोसिस देखील कामगार कपातीच्या पवित्र्यात आहे. यामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.
इन्फोसिसच्या या नव्या कर्मचारी कपातीच्या धोरणानुसार, जॉब लेव्हल ६ बँड (JL6) मधील २२०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. कंपनीत JL6, JL7 आणि JL8 बँड्समध्ये एकूण ३०,०९२ कर्मचारी काम करीत आहेत. इन्फोसिस JL3 आणि त्याखालील स्तरावरील आपल्या एकूण कामगारांपैकी २ ते ५ टक्के कपात करणार आहे. म्हणजेच या स्तरावरील एकूण ४,००० ते १०,००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो. इन्फोसिसमध्ये ८६,५५८ कर्मचारी आहेत तर असोसिएट आणि मध्यम बँडमध्ये एकूण १.१ लाख कर्मचारी काम करतात.
कंपनीत उच्चपदांवर ९७१ अधिकारी आहेत. यामध्ये सहाय्यक उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी उपाध्यक्ष सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो. या स्तरावरील सुमारे ५० कर्मचारी बेरोजगार होऊ शकतात.
सुत्रांच्या माहितीनुसार, कर्मचारी कपातीसाठीची ही छाननी स्पष्ट आणि निश्चत स्वरुपाने केली जात आहे. सुरुवातीला कंपनीने परफॉर्मन्सच्या आधारे छाटनी केली होती मात्र, आता मोठ्या प्रमाणावरील कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. आयटी कंपन्यांतील या स्थितीबाबत माहिती देताना अमेरिकेतील एचएफएस रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी फिल फर्श्ट यांनी सांगितले की, सध्या आयटी क्षेत्रात कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांचीच गरज आहे. तर पारंपारिक सपोर्ट सेवांसाठी कमी कर्मचाऱ्यांची गरज आहे. कारण, आता बरेच काम हे स्वयंचलित यंत्रांद्वारे केले जात आहे.