इथिओपियामध्ये पंतप्रधानांच्या सभेत स्फोट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/ethopia.jpg)
अद्दिस अबाबा (इथिओपिया) – इथिओपियाचे नूतन पंतप्रधान अबिय अहमद यांच्या सभेमध्ये आज एक प्रचंड स्फोट झाला. पंतप्रधानांच्या भाषणानंतर ते नागरिकांना अभिवादन करत असतानाच हा स्फोट झाला. देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणण्याचे आवाहन अबिय अहमद यांनी केले आहे. त्यांच्या भाषणानंतर लगेचच स्फोट झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव अहमद यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. हा स्फोट पूर्ण तयारीनिशी घडवण्यात आला होता. मात्र तो अपयशी ठरला असा आरोप अबिय अहमद यांनी केला आहे. त्यांनी या स्फोटासाठी कोणावरही आरोप केला नाही. मात्र पोलिस तपास करत असल्याचे सांगितले.
या स्फोटामध्ये एक जण मरण पावला. तर 83 जण जखमी झाले. त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे, असे अबिय यांच्या चीफ ऑफ स्टाफ आणि आरोग्य मंत्री आमिर अमन यांनी सांगितले.
हा स्फोट घडवण्यासाठी स्टेजच्या दिशेने हातबॉम्ब फेकण्यात आला होता. मात्र तो गर्दीतच पडून फुटला. पोलिसांच्या गणवेशातील व्यक्तीने हा हातबॉम्ब फेकला असे एका साक्षीदाराने सांगितले. जवळच्या एका पोलिसाने हल्लेखोराला पकडले.