इंटरनेट ब्लॉक केले तरी व्हाट्सऍप चालूच राहण्याने सुरक्षा यंत्रणेला चिंता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/whatsapp-1.jpg)
नवी दिल्ली – अशांत भागातील इंटरनेट ब्लॉक केले तरी व्हाट्सऍप कॉलिंग सेवा चालूच राहत असल्याने सुरक्षा यंत्रणेसाठी ती चिंतेची बाब बनली आहे. व्हाटसऍप कॉलिंग सेवा कशी बंद करता येईल याची तपासणी सुरक्षा यंत्रणा करत आहे. काश्मीरमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडिया सेवा ब्लॉक केल्या, तरी दहशतवादी व्हाट्सऍपद्वारे सीमेपलीकडील आपल्या नियंत्रकांच्या सतत संपर्कात राहू शकतात ही गोष्ट जम्मू-काश्मीरमध्ये पकडलेल्या काही दहशतवाद्यांकडून उघड झाली आहे. नगरौटा येथे 2016 मध्ये लष्करी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सीमेपलीकडून सतत सूचना मिळत होत्या असे काश्मीरमध्ये अटक केलेल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने सांगितले आहे.
गृह सचिव राजीव गाबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रश्नावर प्रामुख्याने विचार झाला. या बैठकीत इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दूरसंचार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा ब्लॉक केली, तरी पाकव्याप्त काश्मीरमध्ये ती चालूच राहते. परिणामी भारतीय भागात व्हाट्सऍप सेवा चालूच राहते आणि त्याचा फायदा दहशतवाद्यांना होतो. त्यांना नवीन माहिती मिळत राहते आणि पळून जाण्यास मदत होते. यावर उपाययोजनांची बैठकीत चर्चा झाली.